एमपीसीबी प्रशासन अधिकार्यांचे दुर्लक्ष
। चणेरा । प्रतिनिधी ।
धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या अक्षरशः नाजूक स्थितीतून जात आहेत. त्यातच वाढती राजकीय ठेकेदारी, सीएसआरचा मलिदा खाऊ धोरणाने बड्या कंपन्यांनाही झटका बसला आहे. हे भयान वास्तव असतानाच अनेक कंपन्या अपघाती घटना रोखण्यात अपयशी ठरल्या असून ट्रान्सवर्ड पाठोपाठ साधना कंपनीच्या भयानक अपघातात चार कामगारांना जीव गमवावा लागला होता. तरीही घटनांतून स्थानिक मुख्यत: कारखाना निरीक्षक, एमपीसीबीच्या अधिकार्यांनी काहीच बोध घेतलेला नाही. यातच एमआयडीसीतील अनेक कंपन्यांतील विषारी जल, वायू प्रदूषणानेही उच्चांक गाठला आहे. यामुळे पररिसरातील गावांना वायू प्रदुषणाचा मोठा फटका बसत आहे.
याबाबत एमपीसीबी प्रशासन अधिकार्यांना याचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. कारण आतापर्यंत एमपीसीबीचे अधिकारी कंपन्यांना भेटी देण्याच्या नावाखाली ‘मस्त चाललंय आमचं’ असेच खाते धोरण राबवत आले आहेत. यातून कंपन्या अधिकार्यांचे धैर्य वाढल्याने सॉल्वे, दानशमंद, अंथेआ, एक्सेल, युनिकेम कंपन्या परिसरातील तळाघर, बोरघर, निवी, लांढर गावांना वायू प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. दररोज वायू प्रदूषणाची मात्रा वाढत असल्याने परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, फुप्फुसाचे आजार, उलटी, जुलाब व्याधींनी डोके वर काढले आहे. तसेच, विषारी वायू प्रदूषणाने भातशेती, कडधान्य यांसह सर्वच पिके कायम धोक्यात आली आहे. शेतकर्यांना भरपाई देण्यासाठी आजवर कोणीच प्रयत्न केलेले नाहीत. दरम्यान, विषारी वायू प्रदूषण करणार्या लगतच्या सॉल्वे व अन्य कंपन्यांना वेळीच रोखावे, अन्यथा संबंधीत कंपन्यांविरोधात लढा उभारू, तर शेतीच्या नुकसानीबाबत लवकरच आंदोलन उभारले जाईल, असा इशारा विठ्ठल मोरे यांनी दिला आहे. यावेळी वायू प्रदूषण तक्रारीबाबत एमपीसीबीचे अधिकारी यांच्याशी केलेल्या संपर्काला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तळाघर परिसरातील विषारी वायू प्रदूषण तातडीने रोखण्यात एमपीसीबीचे प्रशासन अधिकारी यशस्वी ठरतात का, यावर बळीराजा फांऊडेशन नेमका काय पवित्रा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.