इम्रान खान यांना दहा वर्षांचा तुरुंगवास

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. न्यायाधीश अबुआल जुल्कानैन यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश सुनावला. इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या वॉशिंग्टनमधील दूतावासातून पाकिस्तान सरकारला कळवण्यात आलेली गोपनीय माहिती इम्रान यांनी सार्वजनिक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शाह मेहमूद कुरेशी हे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे नेते आहेत. या पक्षाने या दोघांना शिक्षा सुनावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, सदर प्रकरण हे या दोघांविरोधात रचलेलं षड्‌‍यंत्र असल्याचा आरोप पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाने केला आहे.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इमरान खान यांना हा मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयवर सरकारने कडक कारवाई केली आहे. त्याचे निवडणूक चिन्ह बॅटवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version