। दापोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्यात एकेरी उल्लेख करुन टिंगलटवाळी केल्याच्या कारणावरुन काही जणांकडून माफीनामा लिहून घेऊन तोंडाला काळे फासल्याची घटना घडली.
आंजर्ले येथील काहीजण फिरण्यासाठी दीपस्तंभानजीक गेले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख असलेले टिंगलटवाळीचे गाणे म्हणण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार समाजमाध्यमांवर व्हायरल होताच मंगळवारी गावात स्थानिक तरुणांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित तरुणांनी माफी मागितली. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तेथेच येऊन माफी मागण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी हे सर्वजण तेथे माफी मागण्यासाठी पोहोचले. मात्र संतप्त शिवप्रेमी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे झाले त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संतप्त जमावाने संबंधित तरुणांच्या तोंडाला काळे फासले. मात्र अखेर छत्रपती शिवरायांची माफी मागितल्यानंतर विषय थांबविण्यात आला. यावेळी दापोली पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जमावाने शेकडो लोकांच्या साहाय्याने एक निवेदनही दापोली पोलिसांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्यांकडूनही लेखी माफीनामा घेण्यात येऊन तो पोलिसांकडे देण्यात आला.