भालगाव ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा राष्ट्रवादीला दे धक्का

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एल.डी.मोहिते यांनी शेकाप नेते पंडीत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात गोपाळवट येथील भूमिपूजन कार्यक्रमात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच रोहा तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान ग्राप सदस्याने शेकापमध्ये प्रवेश केल्याने हा शेकापचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. भालगाव ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. पंडीत पाटील तसेच खारगाव जिप सदस्य आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची सत्ता हातात नसताना देखील अनेक विकासकामे मार्गी लागत असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र भूलथापा आणि आश्‍वासनांच्या शिवाय काहीच पदरी पडत नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हाती घेत असल्याचे ग्राप सदस्य एल.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. अतिवृष्टीमुळे गोपाळवट गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर वाहून गेल्यानंतर जिप सदस्या नम्रता कासार आणि मी स्वतः याठिकाणी येऊन पाहणी करून नवीन विहिरीसाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या विहिरीचे काम मार्गी लागले असून या विहिरीच्या भूमिपूजनाचा नारळ फोडताना आश्‍वासन पूर्तीचा आनंद होत आहे असे शेकाप नेते पंडीत पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक गणेश मढवी, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर, नंदेश यादव, विनायक धामणे, संतोष दिवकर, चंद्रकांत झोरे, ग्राप सदस्या सुहासिनी भाऊ डिके आदि मान्यवर संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version