कलाकारांना मानधन सुरु करावे: टेंबे
माणगाव | सलीम शेख |
कोकणात गणेशोत्सवात बाल्या नाचाबरोबरच शक्ती,तुरे या कलावंतांना विशेष महत्व असते.ही कला जिवंत राहण्यासाठी सरकारने या कलाकारांना मानधन सुरु करावे,अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण भागातील शाहीर, नाच पथके तसेच शक्ती,तुरेवाले करतात ही परंपरा शेकडो वर्षापासून कोकणात चालत आली आहे.ढोलकी, मृदुंग, टाळ, घुंगरू असे विविध वाद्यांचा आवाज कानावर पडल्यानंतर लहानापासून थोरापर्यतच्या सर्वांचीच पाऊले गावातील वेशीकडे आपोआप पडतात. सवाल – जबाब ऐकण्यासाठी भुकेलेला रसिक बाल्या नाचाच्या प्रेमात पडतो.तहानभूक विसरून तो काही काळ या कलाकारांना दाद देतो. त्यामुळे इतिहासाचा वेध घेणारा कोकणातील प्राचीन परंपरा जोपासणारा बाल्या नाचफ सर्वांचाच कौतुकाचा विषय बनला असून श्रावणात असणार्या सणामध्ये या नाचाला दिवसेंदिवस अधिक महत्व प्राप्त होत आहे. शक्तीवाले – तुरेवाले यांच्या रूपाने आकर्षक अशा वेषभुषात यांतील कलाकार हे नाच सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकत असतात.
रायगड जिल्ह्यात सुमारे दोनशे, रत्नागिरी दीडशे, सिंधुदुर्ग दीडशे कला पथके आपल्या कला सादर करतात. शासनांनी या कले कडे दुर्लक्ष केले असले तरी तमाम रसिकांनी या बाल्या नाचाला अक्षरशः डोक्यावरच घेतले आहे. रायगड – रत्नागिरी कलगी तुरा सांस्कृतिक शाहिरी कला क्रीडा मंडळ हे कोकणातील तमाम कलाकारांचे प्रश्न शासनाकडे वेळोवेळी मांडत आहे. कलाकारांना राज्य शासनांनी ज्या प्रमाणे मानधन सुरु केले त्याच प्रमाणे केंद्र सरकारनेही मानधन सुरु करावे. असे रायगड,रत्नागिरी कलगी तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली.
रामभाऊ टेंबे हे स्वतः सन 1970 पासून शाहीर आहेत. वयाच्या 17 व्या वर्षा पासूनच त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. त्याचे वडील कै. दत्तू बारक्या टेंबे व चुलते विठोबा रामजी टेंबे, मोठे बंधू बाबूराव दत्तू टेंबे तसेच चुलतभाऊ शिवराम गणपत टेंबे याच्या कडून त्यांना प्रेरणा मिळाली. गुरु परंपरा कलगी तुर्यात असल्यामुळे महाड तालुक्यातील वरंध गावचे गुरुवर्य दत्ताराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य काशीराम रसाळ व नथुराम गोरीवले यांचे ते शिष्य बनले. जनजागृती करताना तमाशा फडा बरोबरच ते शाहीरही करू लागले.
शक्ती – तुरा कार्यक्रमात साधारण पंचवीस ते तीस कलाकार असतात यातील कलाकार अठरा वर्षाच्या वरील असून त्याला वयाची मर्यादा नाही. प्राचीन काळापासून चालत आलेला असून सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत कोकणात गावागावात व गल्लीत सादर केला जातो.
असे झाले नामकरण
ज्या शेठकडे ही मुले काम करायची व सुट्टी असेल तेव्हा कोकणातील तरुण मंडळी जमेल तेव्हा एकत्र येऊन कोकणातील पारंपारिक नृत्य करायचे. तेथील पूर्वीचे शेठलोक या मुलांना बाल्या या टोपण नावाने संबोधायचे त्यातून बाल्याचा नाच म्हणून नाव पडले. बाल्या हे नाव शहरात पडले. हा बाल्याचा नाच नसून पौराणिक परंपरेतील इतिहासकालीन चालत आल्यामुळे गौरी – गणपतीच्या सणातील नाच अशी ओळख मिळावी. असा सूर कोकणातील शक्ती तुरेवाले कलाकारातून उमटत आहे.