शेकडो महिलांनी लुटले सौभाग्याचं वाण
| भाकरवड | वार्ताहर |
दिवस मानाचा.. सौभाग्याचा…. असा महाराष्ट्राच्या क्रमांक एकच्या कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यास मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रारंभ झाला आहे. अलिबाग, खालापूर येथील यशस्वी आयोजनानंतर शुक्रवारी (दि. 31) पोयनाड येथील गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात हा सोहळा कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. खारेपाटात रंगलेल्या या सोहळ्यास शेकडो महिला आपल्या पारंपरिक पेहरावात उपस्थित होत्या. सौभाग्याचं वाण लुटताना यावेळी त्यांच्या चेहर्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या कार्यक्रमास चित्रलेखा पाटील यांच्यासह शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, महिला आघाडी सदस्य अनिता पवार, नागेश्वरी हेमाडे, संगीता म्हात्रे, अनिता काकडे, कल्पना पाटील, प्रमोद राऊत, सचिन पाटील, पोयनाड सरपंच शकुंतला काकडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी प्राप्त करुन दिली होती. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून तिळगुळ आणि वाण भेट देत आनंद द्विगुणित केला. उपस्थितांपैकी अनेक सुवासिनींनी एकापेक्षा एक सरस उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रारंभीच मागील निवडणुकीत माझ्यावर विश्वास ठेवून भरघोस मते दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले.
त्या पुढे म्हणाल्या माझ्या आईवडिलांनी कायम शिकवलेय की, गरीबांना मदत केली पाहिजे. तुम्ही कधीही हाक मारा, ही तुमची बहीण तुमच्यासाठी सदैव मदतीसाठी तत्पर असेल. माझा आठवड्यातून एकदा अलिबागमध्ये शेतकरी भवनमध्ये दरबार भरतो. यावेळी हजारो लोक त्यांच्या अडीअडचणी घेऊन मदतीसाठी येत असतात. त्या सर्वांनाच एकाच वेळी मी मदत करु शकत नाही; परंतु, विश्वासाने सांगते की, जास्तीत जास्त लोकांची कामे माझ्या हातून होतात, याचे मला समाधान आहे.
मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की, तुम्ही पण या विभागातील गोरगरीब माणूस तो सच्चा असेल, तर त्याला माझ्याकडे आणा, त्याला मदत करण्याची जबाबदारी माझी आहे. कोणा मुलीला सायकल द्यायची असेल, कोणाला धान्य वाटप करायचे असेल, महिला बचत गटाला स्वतःच्या पायावर उभे करायचे असेल, एखाद्या मुला-मुलीला नोकरी द्यायची असेल, तर ते काम आपण निश्चितपणे आपण करु, असे वचन यावेळी चित्रलेखा पाटील यांनी दिले. या पोयनाडचे पुढचं आयुष्य सुखा-समाधानाचं जावो, आणि तुम्हाला वचन देते की, कधीही तुम्हाला काहीही लागलं, तर कधीही एकटं वाटून देऊ नका. कारण, मी तुमच्या कायम सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनी एखादी महिला अडचणीत असेल, तर ती कुठल्या पक्षाची आहे, हे न पाहता तिच्या अडचणी सोडविण्यासाठी तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा, अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.
घेतला वसा सोडणार नाही
मी या खारेपाटाची, स्वर्गीय नारायण नागू पाटील यांच्या तिसर्या पिढीची सून आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत ज्याप्रमाणे कार्य केलेय, तसेच यापुढेसुद्धा करणार आहे. गोरगरीबांच्या मदतीचा, मुलींच्या सायकल वाटपाचा, धान्यवाटपाचा घेतलेला वसा कधीच सोडणार नाही. हेच माझे संस्कार आहेत, हाच माझा विचार आहे, असे आश्वासन यावेळी चित्रलेखा पाटील यांनी दिले.