। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील बैठकीत केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बंडखोरीच्या तयारीत असलेले राजेश लाटकर यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.
शाहू महाराज यांनी राजेश लाटकर यांना ‘मविआ’चा पुरस्कृत उमेदवार म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव मांडला. त्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी अनुमोदन दिले. सर्वांनी मंजुरी दिली. यावेळी शाहू महाराज म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागा निवडून आणण्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे. राजेश लाटकर यांच्या पाठीशी राहूया. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत इंडिया महाविकास आघाडीची ताकद दाखवून देऊया. आमदार जयंत आसगावकर, पक्ष निरीक्षक सुखवंतसिंह ब्रार, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, आर. के. पोवार घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.