नेरळ पोलिसांनी ठोकल्या चेारट्यांना बेड्या; आठ गुन्ह्यांची उकल
| नेरळ | प्रतिनिधी |
वीज रोहित्र खोलून त्यामधून तांब्याची तार चोरणाऱ्या चोरांना नेरळ पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. चोरटे मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात सापडला असून, त्यांनी कर्जत, नेरळ आणि खोपोली पोलीस ठाणे हद्दीत तब्बल आठ ठिकाणी वीज रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार लंपास केली होते. नेरळ, कर्जत, खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्ट 2023 पासून चोरीचे सत्र चालू होते. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या मालकीची आणि खासगी मालकी असलेले वीज रोहित्र खोलून त्यामधील ऑईलचे नुकसान करून त्यातील तांबे स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेले होते. त्याप्रमाणे नेरळ पोलीस ठाणे येथे तीन गुन्हे दाखल होते. दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्याकरिता नेरळ पोलीस ठाणे यांनी एक पथक तयार केले होते.
या पथकातील श्रीरंग किसवे यांना गोपनिय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ परिसरात फिरणाऱ्या आवेश आस्लम खान (वय 20) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आवेश जिते येथील सिमा लॉन्स हॉटेलजवळील रहिवासी असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर नेरळ पोलिसांच्या पथकाने त्याचे आणखी दोन साथीदार शहजाद आब्बास खान आणि आशपाक आब्बास खान यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 505 किलो ग्रॅमची तांब्याची तार किंमत तीन लाख तीन हजार, मारूती कंपनीची स्वीफ्ट गाडी क्रमांक एम.एच. 12 सी.वाय 7429 किंमत अंदाजे 4 लाख रूपये, असा साधारणतः सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत,विजय लगारे उपविभागिय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी नेरळ पोलिसांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे तसेच हवालदार नवनाथ म्हात्रे, निलेश कुमरे, विनोद वांगणेकर, नेरळ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील पोसई नितीन मंडलीक, सहा. फौजदार श्रीरंग किसवे आणि तपास पथक यांचे महत्त्वाचे योगदान होते.
