लोखंडी रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत; निश्‍चित जागी घोडे बांधण्याची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांना पर्यटनासाठी घोड्यांवरून सैर करावी लागते. त्यासाठी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे घोडा स्टॅन्ड निश्‍चित करण्यात आला असताना देखील अश्‍वपाल अन्य ठिकाणी घोडे बांधून ठेवत आहे. दरम्यान, वन व्यवस्थापन समितीने बनवलेले लोखंडी रेलिंग अश्‍वपालांमुळे निकामी होत आहे. त्यामुळे ते सर्व घोडे त्यांना दिलेल्या ठिकाणीच बांधण्यात यावेत अशी मागणी संयुक्त व्यवस्थापन समितीने नगरपालिकेकडे केली आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बांधलेल्या रेलिंगला घोडे बांधले जात असून एकावेळी असंख्य घोडे बांधले जात असताना ते घोडे त्या लोखंडी रेलिंगला हलवत असतात. त्याचा परिणाम म्हणजे त्या रेलिंग खिळखिळ्या झाल्या असून घोडेवाल्यांच्या चुकीमुळे वन व्यवस्थापन समितीने जपलेले लोखंडी रेलिंग कधीही कोसळू शकते. त्यामुळे अनेक वर्षाच्या मेहनतीने उभी राहिलेली झाडे पुन्हा नामशेष होऊ शकतात. त्यामुळे तत्कालीन संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. घोडेवाले मुद्दामहून तेथे घोडे बांधून रेलिंग निकामी नाकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना घोडे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असताना वन व्यवस्थापन समितीने उभारलेल्या रेलिंगलाच घोडे बांधण्याची चूक का करतात? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Exit mobile version