श्रीवर्धनला पहिल्याच पावसात दाणादाण रस्त्यावर पाणी, दीड तास वाहने अडकली

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. शिस्ते येथे पाणी साचून राहिल्याने रविवारी सकाळी दीड तास वाहने अडकून पडली होती. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन भागात लावणीला तयार झालेली पिके ही बहुतेक पाण्याखाली गेली तर श्रीवर्धन मधील शिस्ते व कापोली येथील मार्गावर काही ठिकाणी पाणी आले होते. रविवारी दिवसभरात कोठे मोठे नुकसान झाल्याची नोंद नव्हती. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात पाणी तुंबण्याची अवस्था झाल्याने नालेसफाई, माती भराव यांमुळे येत्या पावसाच्या तीन महिने याहून भयानक परिस्थिती असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिस्ते येथे तर दरवर्षी पाणी साचते व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून यासाठी कोणत्याही प्रकारची उपयोजना केली जात नाही. त्यामुळे बोर्ली कडून वडवली मार्गे मुंबई कडे किंवा दिघी कडे जणार्‍यावाहनांना अडथळा निर्माण होतो. किंबहुना वाहतुकीचा खोळंबा होत एसटी प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. बोर्लीपंचतन येथील पुलाच्या जवळ दोन्ही बाजूला खुप मोठ्या प्रमाणावर भराव झाल्याने रस्ताच खोलात गेला आहे त्यामुळे पावसात याठिकाणी चिखलमय पाणी साचून राहते. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

रस्ते पाण्याखाली
बोर्लीपंचतन शहराच्या पोहामील नाका ते दत्तमंदिर याठिकाणी यंदा अनेक नाल्यातून मोर्‍या बसविण्याचे काम उशिरा सुरू झाले. मात्र, सध्या पावसात बंद ते झाले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील सकल भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचले.

Exit mobile version