। अलिबाग । वार्ताहर ।
एसटी महामंडळ दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.2025-26 पासून उर्वरित 20 हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणार्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते म्हणाले, एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणार्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे 34% खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे 10 लाख 70 हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे 34 हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात. भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सी.एन.जी. आणि एल. एन. जी. हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेल पेक्षा स्वस्त असून पर्यावरण पूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लीटर 5-5.5 किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ 4 किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एल.एन.जी व सीएन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. सबब, पुढील वर्षीपासून घेण्यात येणार्या नव्या 20 हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणार्या घेण्यात येणार आहेत.
राज्यभरात 90 ठिकाणी एलएनजीचे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारे सी.एन.जी.चे 20 पंप उभारले जात आहेत.त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार असून या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चरकंपन्या कडून मागविण्यात आले असून भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणार्या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस आहे.
एल.एन.जी. इंधनावर 20% सुट
एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एल.एन.जी.इंधन हे तत्कालीन डिझेलइंधनाच्या किमतीच्या 20% कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी 235 कोटी रुपयांची बचत होणार आहे.