। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा हा समुद्रकिनारी वसला असून येथे नद्या, डोंगरदर्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीविताचे नुकसान होते. त्यामुळे या आपत्तींपासून बचावासाठी व विविध उपाययोजना राबविण्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी 30 लाखांचा निधी देण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात 103 धोकादायक गावे आहेत. या गावांना दरवर्षी दरड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय जिल्ह्यातील दरड कोसळण्याचा धोका असणारी गावे तसेच पूरग्रस्त गावे यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथील गावांसाठी आपत्ती व्यवस्थापन किट असणे आवश्यक होते. जिल्ह्यामध्ये दरवर्षी लहान-मोठ्या स्वरूपात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी जिल्ह्यातील अपघात मित्रांना दरवर्षी ट्रेनिंग दिले जाते. यावर्षीपासून प्रत्येक गावातून एका स्वयंसेवकाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून त्याचा थेट संपर्क हा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी होईल. त्यामुळे मदत लवकर मिळणे शक्य होईल.
किटमध्ये 10 वस्तूंचा समावेश
एनडीआरएफसोबत अपघात मित्र हे मदतीसाठी धावून जातात. यासाठी त्यांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. यावर्षीही तीन हजार 500 अपघात मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 15 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीकरिता हे पथक आपल्या जिल्ह्यात कार्यरत असते. पथकामध्ये दोन अधिकारी, 28 जवान असा 30 जणांचा समावेश असतो. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीतून आतापर्यंत जिल्ह्यात 400 व्हिलेज किटचे वाटप झाले आहे. त्यामध्ये पाण्यात तरंगणारे स्ट्रेचर, बॅटरी, सुरक्षा जाळे, लाइफ जॅकेट, रोप, ग्लोव्हज, गमबुट अशा 10 वस्तूंचा समावेश आहे.
उद्घोषणा प्रणाली सुपूर्द
आपत्ती काळामध्ये संवाद साधण्यासाठी एकमेव प्रभावी साधन म्हणून सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे गावातील यंत्रणेशी संवाद साधून त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अलर्ट केले जाते. वीजपुरवठा खंडित झाला तरीही प्रणाली सुरू राहत असल्याने तिचा आपत्ती काळात मोठा उपयोग होतो. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा धोकादायक असणार्या गावांना टू वे कम्युनिकेशनसाठी ही प्रणाली देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला सीम कार्डही देण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक धोकादायक गावात पावसाची स्थिती, हवामानाचा अंदाज याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकणार आहे.
जिल्ह्यात 400 व्हिलेज किटचे वाटप
1 | तालुका | किटची संख्या |
2 | अलिबाग | 25 |
3 | कर्जत | 56 |
4 | खालापूर | 16 |
5 | तळा | 06 |
6 | पनवेल | 24 |
7 | पोलादपूर | 47 |
8 | महाड | 99 |
9 | माणगाव | 46 |
10 | रोहा | 16 |
11 | श्रीवर्धन | 20 |
12 | सुधागड | 21 |
13 | म्हसळा | 07 |
14 | मुरुड | 08 |
15 | उरण | 10 |