दास्तान फाटा उड्डाणपुलाचे लोकार्पण

वाहतुकीची समस्या होणार दूर

| उरण | वार्ताहर |

मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरील 1250 मीटर लांबीचा (1.2 किमी) आणि रांजणपाडा रेल्वे क्रॉसिंग या दोन्ही उड्डाण पुलांचे बुधवारी (दि.16) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दोन्ही उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नोकरदार, प्रवासी, वाहन चालक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

जासई-दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई-चिर्ले रेल्वे क्रॉसिंग वरुन दररोज जड-अवजड आदी हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र दर 20 मिनिटांनी धावणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे या मार्गावरील रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे दास्तान फाटा ते चिर्लेदरम्यान रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-2 हा 1250 मीटर लांबीचा आणि 47.02 कोटी खर्चाचा तसेच रांजणपाडा रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-3 हा 1010 लांबीचा आणि 19.38 कोटी खर्चाचे दोन उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, उद्योगपती जे.एम.म्हात्रे, अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहाराध्यक्ष कौशिक शहा, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ घरत, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर आदी सह शासकीय अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, प्रवासी नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version