जे.एस.एम महाविद्यालयाचा उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कष्टकरी, कामगार आणि शेतकर्यांचे नेतृत्व, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विधानपरिषद आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे.एस.एम महाविद्यालयात विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे तसेच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयीन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होईल, अशा विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे व रोजगार प्राप्तीसाठी त्याचा लाभ व्हावा, याकरिता जे.एस.एम महाविद्यालयातर्फे डायरेक्ट-इनडायरेक्ट टॅक्सेस, डी.एम.एल.टी., डिजिटल मार्केटिंग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि ब्युटी पार्लर कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. या सर्व कोर्सेसचे डिजिटल उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सर्व अभ्यासक्रमांच्या माहिती पुस्तिकांचे प्रकाशनही करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीनचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे, उपप्राचार्य डॉ. सोनाली पाटील, सीडीसी सदस्य प्रा. वसंत जोशी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. गौतम पाटील यांनी या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल, असा आशावाद व्यक्त करून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. तसेच यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले आहे.यावेळी पॅरामेडिकल एज्युकेशन एस.पी. मोरे या संस्थेचे पीआरओ आर्यन शेळके व अनिल मखामले, रायगड टॅक्स कन्स्टंल्टंट असोसिएशनचे सदस्य विजय साळसकर, पॅशन ब्युटी पार्लरचे प्रतिनिधी नितीश म्हात्रे उपस्थित होते. यावेळी या कोर्सचे समन्वयक प्रा. सत्यजित तुळपुळे, प्रा. मयुरी पाटील, प्रा. श्वेता पाटील, प्रा. श्वेता मोकल, डॉ. सीमंतिनी ठाकूर यांनी या कोर्सेसबद्दल सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. प्रा. जयेश म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. सोनाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.