। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन व परिवर्तन फेरीवाला वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने फेरीवाल्यांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हातावर पोट असणार्या दीडशेच्या वर फेरीवाल्यांनी मुसळधार पावसात कांदा बटाटा मार्केट येथे कृषी उत्पन्न समिती बाजार आवारात मोर्चा काढून आपल्या व्यथा मांडल्या. मार्केटचा गेट बंद केल्यामुळे फेरीवाल्यांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये स्त्रिया, तरुण वर्ग तसेच वयोवृद्ध गटाचाही सहभाग होता. स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी मुसळधार पाऊस असतानाही ही जनता एपीएमसी प्रशासना ला जाब विचारण्यासाठी आक्रमक होऊन घोषणा देत होती तसेच हक्काची जागा मिळावी यासाठी मागणी करत होते. यावेळी फेरीवाला असोसिएशनचे बाळकृष्ण खोपडे, विनोद पार्टे, जेठाराम राठोड, इस्माईल शेख आणि अनेक फेरीवाले उपस्थित होते.