। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा नवघर येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांमध्ये विविध कलांची आवड निर्माण करणे आणि शाळेतील विविध कार्यक्रमांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने ग्राम युक्ती संस्थेच्या मार्फत कॅप्टन रावसाहेब आणि राव मॅडम यांनी 1200 स्केअर फुटांचा रंगमंच बांधून दिला आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या रंगमंचाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, राम चव्हाण, संचालक ग्राम युक्ती संस्था आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व पालकांची मने जिंकली. या कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब, श्री. बांगारे आणि शाळेचे माजी मुख्याध्यापक जगदीश म्हात्रे व राकेश गदमले यांचा शाळेतील शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सुधागड तालुक्याचे माजी सभापती रमेश सुतार, नवघर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती कदम, उपसरपंच डी. सी. चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश जाधव, माजी अध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस पाटील किशोर दळवी, विकी रोकडे आणि बहुसंख्य ग्रामस्थ, पालकवर्ग, माजी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे यांनी केले.