कौटिल्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि.17) अर्थशास्त्र विभागाअंतर्गत कौटिल्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच, ॲडम स्मिथ स्मरण दिनानिमित्त ॲडम स्मिथ आणि वर्तमान अर्थव्यवस्था या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय व तृतीय वर्षातील अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी विशाल, सिद्धी सिंदकर, समृद्धी ओव्हाळ यांनी स्टॉक मार्केट, डिजिटल इकॉनोमी अँड सायबर क्राईम तसेच क्लायमेट चेंज अँड ग्रीन इकॉनोमी या विषयांवर सादरीकरण केले.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शेख आलम गफूर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या वक्तव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲडम स्मिथ यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान स्पष्ट करतानाच त्यांचे विचार वर्तमान अर्थव्यवस्थेत कसे लागू पडतात, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय वक्तव्यात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे कौतुक करतानाच कौटिल्य अभ्यास मंडळाला शुभेच्छा दिल्या. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी आपल्या प्रस्ताविकात हे कार्यक्रम करण्यामागील विभागाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अर्थशास्त्र विभागातील सहा. प्रा. जयश्री ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पूजा म्हात्रे, प्रा. नितीन कराळे, प्रा. हर्षल काठे, प्रा. स्वराली ठाकूर तसेच अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version