आ. भरत गोगावलेंची उपस्थिती
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील जलतरण तलावाच्या सुविधेचे आ. भरत गोगावले यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. बार्टीतर्फे या राष्ट्रीय स्मारकात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एक असणारी जलतरण तलाव सुविधा मात्र अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. महाडकर नागरिकांसह स्थानिक क्रीडा व जलतरणप्रेमींनी वारंवार शासनाकडे व बार्टीकडे हा तलाव सुरू करण्यासाठी विनंती केली होती.अखेर बुधवार, दि. 27 सप्टेंबर रोजी आ. भरत गोगावले यांच्या हस्ते या जलतरण तलावाचे व्यावसायिक तत्त्वावर लोकार्पण करण्यात आले आहे. बार्टी आणि एच टू ओ स्विमर्स क्लब, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक तत्त्वावर ही सुविधा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.
याप्रसंगी आ. भरत गोगावले यांच्यासमवेत बार्टीतर्फे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, मुख्याधिकारी संतोष माळी, अभियंता प्रवीण कदम, रमाकांत भोईर, परेश साळवी, जितेंद्र शेळके, गणेश पाटील आदींसह नगरपरिषद कर्मचारी,राष्ट्रीय स्मारक कर्मचारीवर्ग व नागरिक उपस्थित होते.