मंगला प्रभुखानोलकर फाऊंडेशनचा रहिवाशांना दिलासा
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील रा.जि.प. शाळा, घोडपापड येथे जलयोजना (बोअरवेल) लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ही वाडी आदिवासी कातकरीवाडी असल्यामुळे येथील रहिवाशांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, मंगला प्रभुखानोलकर फाऊंडेशनच्या मदतीने बोअरवेलच्या स्वरूपात जलस्रोत उपलब्ध करून देण्यात आला, त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमासाठी मंगला प्रभुखानोलकर फाउंडेशनकडे बोअरवेलची मागणी प्रस्तावित करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक काकासाहेब प्रभुखानोलकर यांनी ही मागणी तातडीने मान्य केली आणि शाळेच्या परिसरात बोअरवेल खोदून मोटर बसवण्याची व्यवस्था केली. ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने वाडीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मंगला प्रभुखानोलकर फाऊंडेशनचे विश्वस्त सुनील वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण केंद्रप्रमुख आनंदा पाटील, तसेच सुशील मालुसरे आणि हरिचंद्र वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात रमेश पवार आणि रवी पवार यांनी गावातील समस्यांचा आढावा घेतला. तसेच सरपंच पांडुरंग शेंडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्ता वाघमारे आणि फाऊंडेशनचे किशोर तांडेल, मनीषा वालावलकर यांनी उपस्थित राहून जलयोजनेसाठी योगदान दिले. जलयोजना लोकार्पणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळणार आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जलयोजना उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी फाऊंडेशनचे व्यवस्थापक चंद्रशेखर धुरी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत फुंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका दिशा दुभेले यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक फुंदे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.