| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन दांडा येथील स्मशानभूमीत गेल्या अनेक महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित आहे, तसेच येथील अंत्यसंस्कार विधी चौथऱ्यावर पत्राशेड नसल्याचे समोर आले आहे. या गंभीर समस्येमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी मृतकांच्या नातेवाईकांना आणि दांडा परिसरातील ग्रामस्थांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
दांडा परिसरात भंडारी समाज, मधला कोळीवाडा, तक्का कोळीवाडा येथील कोळीसमाज आणि खारवीवाडा खारवी समाजाची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत विजेची कोणतीही व्यवस्था नसल्याने, रात्रीच्या वेळी जर कोणाचा मृत्यू झाला, तर अंत्यसंस्कार करणे कठीण जाते. अंधारामुळे नागरिकांना भ्रमणध्वनीची टॉर्च किंवा बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागतात. यावेळी अंत्यविधीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वीज व्यवस्था नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. स्मशानभूमीच्या चौथऱ्यावर पत्राशेड नसल्यामुळे पावसाळी दिवसांत परिस्थिती अत्यंत बिकट होते. मुसळधार पावसात चौथऱ्यावर चिता रचणे आणि पुढील विधी करणे अशक्य होते. शेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी तासनतास वाट बघत उभे रहावे लागते.
स्थानिकांची मागणी
दांडा परिसरातील नागरिकांना मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप देता येत नाही. नगरपरिषद प्रशासनाने आमच्या समस्येची दखल घेत स्मशानभूमीत वीज जोडणी करावी आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर चौथऱ्यावर पत्राशेड उभारावी, अशी मागणी श्रीवर्धन दांडा भंडारी समाज, मधला कोळीवाडा, तक्का कोळीवाडा कोळीसमाज आणि खारवीवाडा खारवी समाजाने केली आहे.
श्रीवर्धन दांडा स्मशानभूमी येथे चौथऱ्याची डागडुजी, संरक्षण भिंत, पत्राशेड आणि दिवाबत्तीची व्यवस्था लवकर करण्यात येईल.
ॲड.अतुल चौगुले
नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषद.
