पोलीस मित्र संघटना आक्रमक; तहसीलदार यांना निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि गोरगरीब रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र, 15 वर्षात या रुग्णालयात सुविधांची कमतरता कायम असून पोलीस मित्र संघटनेने रुग्णसेवेबद्दल असलेल्या गैरसोयीबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुधारल्या नाहीत तर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालय याची उभारणी कर्जत तालुक्याच्या सर्व भागातून येणाऱ्या रुग्णांना सेवा मिळावी यासाठी करण्यात आली आहे. मात्र, कर्जत शहरात असलेले उपजिल्हा रुग्णालय शोभेची वास्तू वाटत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात हे रुग्णालय कमी पडत असून, प्रशासकीय यंत्रणा देखील कोणत्याही समस्यांना गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अनेक सुविधा रुग्णांना मिळाव्यात यासाठी पोलीस मित्र संघटना पाठपुरावा करीत आहे. रुग्णालयातील सुविधांबाबत रमेश कदम यांनी डिसेंबर 2025 मध्ये पत्रव्यवहार केला होता. पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष असलेले कदम यांना प्रशासनाने त्याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही.
त्यामुळे संबंधित आरोग्य विभागाची चौकशी करावी आणि उपजिल्हा रुग्णालय संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेकडून कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे करण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून बहुतेक रुग्णांना बाहेरून औषधे आणायला सांगितले जातात. ज्येष्ठ नागरिकांना जाणीवपूर्वक फिटनेस सर्टिफिकेट वर जावक नंबर न टाकता सर्टिफिकेट दिले जात आहे आणि त्यामुळे त्या जेष्ठ नागरिकांना पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात.
रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता असून या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. कुपोषित बालकांसाठी 2024 -25 दोन वर्षात उपचार बंद आहेत. सुट्टीच्या दिवशी रुग्णांना तातडीची सेवा देखील मिळत नाही अशा अनेक समस्यांवर पोलीस मित्र संघटना यांच्याकडून तहसीलदार यांना सूचित करण्यात आले आहे. या सर्व समस्या मार्गी लागल्या नाहीत तर काही दिवसांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय समोर उपोषण केले जाईल असा इशारा रमेश कदम यांनी दिला आहे.
