। नेरळ । संतोष पेरणे ।
कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची स्थापनेत महत्वाचा असलेला तालुक्याचे बाळाराम पाटील यांच्याकडे दिले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्यातील भांडणे मिटवा आणि पक्ष बळकट करा, त्यासाठी आठ दिवस तुम्हाला देत असून हा संवाद कार्यकर्त्यांनी आपल्यात वाढवावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, भाजप हा आपला शत्रू असून शरद पवार यांना आपली कायम साथ राहणार असल्याचे जाहीर केले. नेरळ येथील संवाद मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.
तालुका चिटणीसांना सांगतो आपली कुठली मते कधीच कमी झाली नाहीत. खालापूरमध्ये आपली मते वाढली आहेत. आघाडीच्या राजकारणात तुमच्यावर अन्याय झाला आहे, आपण दोनदा आपला उमेदवार दिला आणि अत्यंत कमी मतांनी पडलो. कळंब आणि खांडसमध्ये मार बसला नसता तर आपण पडलो नसतो.
कर्जतचे दुखणे हे आपले पाय ओढण्यात कार्यकर्ते मश्गुल असतात आणि त्यामुळे आपण मागे पडलो. आपली ताकद होती पण आपल्यातील वाद हे पक्षाच्या वाढीवर परिणाम करताना दिसत आहेत. आपण ज्यांना मोठे केले ते दुसर्या पक्षात गेले असून पक्षाचे पदाधिकारी जात आहेत. ही आपली शोकांकिता आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, कार्यकर्त्यांनी संवाद साधला पाहिजे. तालुक्यात आठ दिवसात प्रत्येकाचे वाद बाजूला करा आणि एक व्हा. तुमच्या यादीनुसार पक्षाचे जिल्हा चिटणीसमंडळामध्ये कर्जतसाठी मोठे स्थान असेल. मात्र पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या घरातील प्रत्येक जण आपल्या पक्षातच कार्यरत असला पाहिजे अशी सूचना केली. तुमच्या तालुक्यात आम्ही जिल्ह्याचे सभापती कायम देत आलो आहोत. ती ताकद पक्ष वाढविण्यासाठी व्हायला हवी होती, पण झाली नाही ही खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एक निवडणूक हरलो म्हणजे सर्व संपुष्टात आले असे नाही, असे ठामपणे सांगत जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज व्हायला हवे असे सांगितले. भाजप हा आपला पक्ष नाही हे लक्षात ठेवा. शेकाप ज्याप्रमाणे काम करतो आणि आपले केडर पाहता कर्जतमध्ये बाळाराम पाटील यांना पूर्ण अधिकार देत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. कर्जतमध्ये वेगळा गट निर्माण झाला असून त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. राज्यात सरकार अस्तित्वात नाही आणि तेथे मंत्री आहेत पण स्वीय सहायक सरकारने नेमले नाहीत. अशी स्थिती असून आरएसएसचे संबंधित स्वीय सहाय्यक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या मंत्र्यांना दिले जाणार आहे, असे काम भाजप करीत असून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजित पवार यांना पुढे करणार आहेत. ते करता आले नाहीत तर ईडी आहेतच. त्यामुळे भाजपला गंभीरतेने घ्यायला हवे, असे जयंत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले की, आपण एका वेगळ्या परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमदार कोणत्याही पक्षाचे जिल्ह्यात निवडून आले असले तरी आपली मते कमी झालेली नाहीत. शेकाप आणि रायगड जिल्हा हे समीकरण कोणीही पुसू शकत नाही. तुमच्या ताकदीची जाणीव ही या कर्जत मतदारसंघात दिसून आली. कर्जत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आघाडीवर होती. आपण महाविकास आघाडीची साथ सोडली आणि आघाडीचा उमेदवार मागे पडला. म्हणजे आपली ताकद आहे हे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे ते आपली ताकद वापरून घेतात. शेकापचा आमदार निवडून आला नसला तरी भविष्यात जिल्हा परिषदेत शेकापचा शिलेदार बसेल, असा विश्वास शेकापचे मा.आ. बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तर, शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगीतले की, कर्जत तालुका पक्षाच्या स्थापनेच्या प्रवाहातील तालुका समजला जातो. जिल्हा परिषदेतील सत्तेच्या योगदानात कर्जत तालुक्याचा वाटा कायम असायचा. त्याच कर्जत तालुक्यात पक्षाच्या वाटचालीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. मात्र, मतदार आपल्याकडे कायम आहेत. तसेच, जिल्ह्यात चार तालुक्यात शेकापने साडेचार लाख मते मिळविली आहेत. काही ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, शेकाप संपला असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी काळात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अत्यंत एकीने आणि ताकदीने सामोरे जा, असे आवाहन सुरेश खैरे यांनी केले आहे.
नेरळ येथील ऋषभ गार्डन येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला जे. एम. म्हात्रे, र.जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, युवक जिल्हा अध्यक्ष देवा पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा चित्रलेखा पाटील, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कर्जत तालुका चिटणीस श्रीराम पाटील, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, दत्तात्रय पिंपरकर, गजानन पेमारे, रवींद्र झांजे आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षाच्या बांधणीसाठी आजचा हा संवाद मेळावा महत्वाचा आहे. मागील 40 वर्षे पूर्वीची ताकद आणि गेली दोन पाच वर्षे पक्षाची घडी विस्कटली आहे. हे येथील कार्यकर्त्यांची माझी दररोजची भेट यातून दिसते. बाळाराम पाटील यांच्याकडे कर्जतमध्ये पालकत्व दिले गेले तर अलिबागवरील ताणदेखील काहीसा कमी होईल. जे कर्जत मी बघत होते, आता तेथे बाहेरून लोक आले आहेत. त्यांना समजून घेणे आणि आपला पक्ष बळकट करण्याची गरज आहे. कर्जत तालुक्यात पक्षाचे प्रत्येक युनिट बळकट करण्याची गरज आहे. पक्षाचा बुलंद आवाज हा कर्जत येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेकाप क्रमांक एकवर असला पाहिजे आणि त्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी सज्ज होऊया .
अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य महिला अध्यक्षा