Bread Price Hike: खाद्यप्रेमींना महागाईचा ठसका; पावाच्या दरात वाढ

। मुंबई । प्रतिनिधी ।

सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसलेला आहे. पेट्रोल-डिझेल तसेच दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. आजपासून अनेक प्रकारच्या ब्रेडच्या किंमती वाढल्या असून पावांच्या लादीमागे तब्बल 5 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

मुंबईत पाव सर्वाधिक प्रमाणात विकला जातो. विशेषतः सर्वसामान्य चाकरमानी, कामगार आणि विद्यार्थी वर्ग वडापाव, मिसळपाव, भाजीपाव, सँडविच यांसारख्या पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे ब्रेडपासून बनणाऱ्या इतर सर्वच खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढणार आहेत. परिणामी, या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार असून त्यांचा रोजचा खर्च वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 मेपासून काही प्रमुख कंपन्यांनी पावाच्या लादींचे नवे दर लागू केले आहेत. वाहतूक खर्च, पॅकेजिंग खर्च, कच्चा माल यांचा खर्च वाढल्याने ब्रेड कंपन्यांनी ब्रेडच्या किंमतीत वाढ केली आहे.

ब्रेडचे नवे दर :
विविध प्रकारच्या ब्रेडचे दर हे चक्क 2 ते 5 रुपयांनी वाढलेले दिसून येत आहेत. ज्यामध्ये 400 ग्राम सँडविच ब्रेडची आधीची किंमत 40 रुपये होती, तीच आता 45 रुपये झालेली आहे. त्यानंतर होल व्हीट ब्रेड 55 रुपयांवरून आता 60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मल्टिग्रेन ब्रेडची किंमत 60 रुपयांवरून 65 रुपये झाली आहे तसेच स्मॉल ब्राऊन ब्रेड 28 रुपयांऐवजी आता 30 रुपयांना मिळत आहे शिवाय व्हाईट ब्रेडची किंमत 20 रुपयांवरून 22 रुपये झाली असून ब्राऊन ब्रेड थेट 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढला आहे.

Exit mobile version