काटेरी निवडुंगांचा अनोखा साज

घराची शोभा वाढविण्यासाठी पसंती

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

परसात व घरांमध्ये तसेच शेतघर किंवा ऑफिसमध्ये प्रामुख्याने फुलझाडे व वेगळ्या शोभिवंत झाडांना पसंती असते. मात्र, काटेरी निवडुंग व जाड पानांची रसदार वनस्पतींची रोपे घर, ऑफिस व परसबागेची शोभा वाढवतील असा कोणी फारसा विचार केला नव्हता. परंतु, आता या वनस्पतींना अनेक जण पसंती देत आहेत. घराची शोभा वाढविण्यासाठी, प्रतिष्ठा व भेट देण्यासाठी प्रामुख्याने या रोपांचा वापर होत आहे.

निवडुंग याला इंग्रजीमध्ये ‘कॅक्टस’ व जाड पानांची रसदार वनस्पतींना ‘सकूलंट’ असे म्हणतात. जिल्ह्यातील बहुसंख्य रोपवाटिकांमध्ये निवडुंग व जाड पानांची रसदार वनस्पतींची विविध प्रकारची रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत. आणि यामुळे रोपवाटिका धारकांना चांगले उत्पन्न सुद्धा मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक देखील आवर्जून ही झाडे खरेदी करत असतात. काही जण वेगळेपणा जोपासण्यासाठी, नवीन काही करण्यासाठी व घर, ऑफिस आणि परसबाग आकर्षक दिसण्यासाठी या झाडांचा उपयोग करत असतात. तसेच, कोणाचा वाढदिवस असो गृहप्रवेश, सेवानिवृत्ती कार्यक्रम, सत्कार समारंभ किंवा इतर कार्यक्रम व समारंभ आदी ठिकाणी भेट म्हणून कॅक्टस व सकुलंट वनस्पती भेट म्हणून दिल्या जातात. तसेच, गणपती उत्सवात आरास सजावटीसाठी देखील या रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे.

असे असतात निवडुंग व सुकूलंट
सकुलंटमध्ये जाड मांसल पाने किंवा देठ असतात. काहींच्या पानांना काटे असतात. तर, निवडुंगाला फक्त काटे असतात. काही निवडुंग वनस्पतींना पाने देखील असतात. या वनस्पतींना कमी प्रमाणात पाणी व खत लागते. परंतु, त्यांना भरपूर प्रकाश आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होणार्‍या वालुकामय जमिनीत ती चांगली वाढतात. सापेक्ष आर्द्रता कमी असलेल्या घरांमध्ये ते चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.
अनेकांची पसंती
विशेष म्हणजे या वनस्पतींची फार निगा राखण्याची व लक्ष देण्याची फारशी गरज नसते. दिसायला देखील चांगली, आकर्षक व लक्षवेधी ठरतात. तसेच, कुंड्यांमधून कुठेही सहज नेता येतात. टेबलावर व खिडकीमध्येदेखील सहज राहतात. या झाडांना पाहून वेगळा आनंद व शांतता मिळते, ताण नाहीसा होतो. आदी कारणांमुळे ही झाडे अनेकांच्या पसंतीस उतरतात.

घर व फार्महाऊस आदी ठिकाणी कॅक्टस व सकुलंट प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला आहे. या वनस्पती अतिशय आकर्षक दिसतात. शिवाय त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आणि आकार सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्याकडे पाहून मनाला एक शांतता मिळते, ताण नाहीसा होतो. तसेच त्यांची फारशी देखभाल करावी लागत नाही.

– विक्रम कुमठकर, फार्महाऊस धारक, रोहा

सध्या कॅक्टस व संकुलंट प्रकारच्या वनस्पतींना अधिक मागणी आहे. आकार तसेच विविध प्रजाती यांच्यानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. इतर वनस्पती व रोपांनुसार यांच्या किंमती देखील आवाक्यात आहेत. शोभिवंत झाडे व फुलांच्या झाडांबरोबरच आता कॅक्टस व संकुलन प्रकारच्या झाडांनी रोपवाटिका व्यापल्या आहेत. शिवाय इतर वनस्पती खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक आवर्जून एकतरी कॅक्टस किंवा सकुलंट वनस्पती घेऊन जाते. यामुळे व्यवसायदेखील चांगला होतो.

-अमित निंबाळकर, रोपवाटिका मालक, पाली

Exit mobile version