। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वझरेत हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात चौघेजण उपचार घेत आहेत. तर चौघांना उपचारानंतर घरी पाठवले आहे.
जिल्हा हिवताप निर्मूलन विभागाच्या पथकाने नुकताच रुग्ण आढळणार्या वसाहतीला भेट दिली. तेथे सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. जवळपास आठ दिवस आरोग्य विभागाचे पथक त्या भागात सर्व्हे करणार आहेत. हिवताप झालेले रुग्ण तेथील इमारती बांधकाम करण्यासाठी पश्चिम बंगाल, झारखंड येथून आलेले कामगार आहेत.
वझरे येथे आंगन नावाचा मोठा गृह निर्माण प्रकल्प उभा राहत आहे. अनेक इमारतींची कामे सुरु असल्याने परप्रांतातून मोठ्या प्रमाणावर तेथे कामगार आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पाणी आणि चिखल मोठया प्रमाणावर साचून राहते. त्यामुळे डासांची पैदास जोरात होत आहे. साहजिकच कामगारांना मोठ्या प्रमाणावर हिवतापाची लागण झाली. काही जण येतानाच बाधित होवून आल्याचेही सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही अशाच प्रकारे कामगार मोठ्या संख्येने बाधित झाले होते. याची दखल घेऊन हिवताप निर्मूलन पथकाने इमारत बांधकाम परिसराची पाहणी केली. डासांची अंडी, अळ्यांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच डास निर्मिती रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली. अजून आठवडाभर औषध फवारणी आणि सर्व्हे सुरुच राहणार आहे.