बेमुदत संप 4 सप्टेंबरपर्यंत स्थगित

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक समन्वय समितीने सर्वांना पेन्शन मिळावी व इतर मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 29) बेमुदत संप पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनामुळे बुधवार (दि. 4) पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना पदाधिकारी यांच्याशी प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी (दि.27) चर्चा केली. ते म्हणाले की, राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारीत निवृत्तीवेतन योजना राबविली जाईल, असे अभिवचन देऊन इतर विषयांबाबत निर्णायक चर्चा व्यस्ततेमुळे दोन ते तीन दिवसांनंतर संपन्न होईल, असे स्पष्ट केले. या बैठकीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अध्यक्ष अशोक दगडे, समन्वय समिती निमंत्रक विश्‍वास काटकर, राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख, सुधाकर सुर्वे, सुरेंद्र सरतापे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या अनुषंगाने समन्वय समितीची विस्तृत ऑनलाईन सभा अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समन्वय समितीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देणे योग्य होईल, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दि. 29 ऑगस्टपासून नियोजित संपाची बदललेली पुढील तारीख 4 सप्टेंबर रोजी समन्वय समितीची विस्तारीत सभा घेऊन ठरविण्यात येईल, असा निर्णय झालेला असल्याने तूर्तास संप स्थगित करण्यात आलेला आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांनी संपाची पूर्वतयारीकरिता मेहनत घेतली तसेच सर्वांनी संघटनात्मक ऐक्य दाखविले त्याबद्दल सर्व संघटना पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील कर्मचारी व शिक्षक यांचे समन्वय समितीतर्फे अध्यक्ष सुरेश पालकर, निमंत्रक प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष कैलास चौलकर व कर्मचारी संघटना अध्यक्ष संदीप नागे यांनी जाहीर आभार व्यक्त केले.

Exit mobile version