| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत 4 बाय 400 मिश्र रिले संघाने कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक पातळीवर रिले शर्यतीत पदक जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे क्रीडाप्रेमींकडून जल्लोष करण्यात येत आहे. प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या संघात भारताने एक बदल करताना रशीदच्या जागेवर श्रीधरला संधी दिली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. भारताने 3 मिनिटे 20.60 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदकावर मोहोर उमटविली. जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भारताचे हे एकूण पाचवे पदक असून, तिसरे कांस्यपदक होय. यापूर्वी सीमा अंतिल व नवज्योत कौर यांनी थाळीफेकीत कांस्यपदक जिंकले आहे. नीरज चोप्रा व हिमा दास यांनी भारताला यापूर्वी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मिश्र रिलेत नायजेरियाने सुवर्ण; तर पोलंडने रौप्यपदक जिंकले.
दरम्यान, मुलींच्या 400 मीटर शर्यतीत कर्नाटकची असलेल्या प्रिया मोहनने अंतिम फेरी गाठून पदक मिळवण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गोळाफेकीत अमनदीप सिंग धालिवालने 17.92 मीटरवर गोळाफेकीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 12 खेळाडूंत स्थान मिळवले.