| क्वालालंपूर | वृत्तसंस्था |
मलेशियामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने आयसीसी महिला 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला 82 धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. 83 धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या 11.2 षटकांत गाठले आणि 9 गडी राखत अंतिम सामना जिंकला. 19 वर्षांखालील महिलांचा टी-20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.
2023 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा अंतिम सामना इंग्लंडविरूद्ध झाला होता आणि या सामन्यात भारताने सात बळी घेत विजय मिळवला होता. आज दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामन्यात 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघी एक गडी गमावत महिला 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारतीय पुरूष संघाने देखील फायनलमध्ये आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली. 36 धावांवर भारताला पहिला गडी गमवावा लागला. स्टार फलंदाज जी कमलिनी 6 धावांवर माघारी परतली. पण त्यानंतर गोंगडी त्रिशाने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्येही कमाल करून दाखली. तिने सानिका चाळकेला साथील घेत 48 धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामध्ये त्रिशाने 8 चौकारांच्या मदतीने 33 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. तर सानिका चाळकेने 22 चेंडूत 26 धावांची कामगिरी केली. भारताने 12 व्या षटकात लक्ष्य गाठले आणि 9 गडी राखून सामना जिंकला.