माथेरान पालिकेच्या आवारात आले नवीन जनरेटर
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून जनरेटरची खरेदी करण्यात आली आहे. नगरपरिषद सभागृह आणि पालिका रुग्णालय यांच्या परिसरात दोन जनरेटर येऊन पडले आहेत. मात्र, ते जनरेटर कोणत्या योजनेतून आणण्यात आले आहेत, त्यांची कोणतीही माहिती पालिकेतून मिळत नाही. त्यातही माथेरान पालिकेच्या आवारात काही वर्षांपूर्वी खरेदी केलेले जनरेटर आहे, मात्र त्या जनरेटरची दुरुस्ती करण्याऐवजी त्या जनरेटरला भंगारात काढण्याची रणनीती आखली असल्याचे दिसून येत आहे.
माथेरान नगरपरिषदेने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सरकारी कार्यालये आणि पालिका रुग्णालय यांच्या संगणकीय यंत्रणा यांना कोणताही धोका पोहोचू नये तसेच सरकारी कामकाज थांबू नये यासाठी जनरेटरची खरेदी केल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या माध्यमातून सध्या तरी दोन जनरेटर संचांची खरेदी करण्यात आली आहे. त्याआधी माथेरान पालिकेकडे सुस्थितीत असलेला जनरेटर पूर्ववत करण्याची तसदी न घेता माथेरान पालिकेने नवीन जनरेटर मागवले आहेत. त्यात पालिकेचे बीजे रुग्णालय यांच्यासाठी जनरेटर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालिकेच्या कार्यालयासाठी असलेल्या जनरेटरची दुरुस्ती करून घेणे आणि बीजे रुग्णालयासाठी नवीन जनरेटर खरेदी करणे अशी गरज होती. मात्र, जुन्या जनरेटर संचाची दुरुस्ती न करता त्या जनरेटरला भंगारात काढण्याचे काम पालिकेने केले आहे आणि दोन नवीन जनरेटर खरेदी केले आहेत.
माथेरान पालिकेच्या आवारात असलेली कार्यालये ही एकाच वीज रोहित्रावर अवलंबून आहेत आणि त्या ठिकाणी वीजपुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यास एकावेळी सर्व परिसर अंधारात जाऊ शकतो आणि त्यावेळी एका जनरेटरदेखील सर्व परिसर उजळू शकतो आणि त्यामुळे दोन जनरेटरची आवश्यकता कशासाठी, असा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे सरकारी पैशाचा गैरवापर माथेरान पालिकेने कशासाठी केला आहे हे समोर यायला हवे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.