| खरोशी | वार्ताहर |
आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून समाजासाठी मोफत शिक्षण मिळावे याकरिता संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे. कंत्राटी कामगार इको-मिनीडोअर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, वीट भट्टी कामगार, कोळसा भट्टी कामगार, हंगामी मजूर, शेतमजूर, घरेलू कामगार, रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, छोटे व्यवसायिक यांचे मासिक उत्पन्न 5 हजारांपासून 12 हजार रुपयांवर आले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हे मुश्किल झालेले आहे.
रायगड जिल्ह्यातील पटसंख्याअभावी 300 हून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील 14 हजार शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावांतील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील 14 हजार गावांतील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे.
पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च 35 ते 40 हजार रुपये, अकरावी बारावीच्या मुलांचा शैक्षणिक खर्च 2 ते 3 लाख रुपये, एमबीएसाठी शैक्षणिक खर्च 5 ते 6 लाख रुपये, इंजिनिअर होण्यासाठी खर्च 12 ते 15 लाख रुपये, डॉक्टर होण्यासाठी 60 ते 70 लाखांपेक्षाही खर्च होतो. आज शिक्षणाच्या खासगीकरणामुळे सर्व समाजातील गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत.
भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे. ज्ञानाअभावी माणसाची विचार करण्याची शक्ती थांबते आणि माणूस सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहतो. म्हणून ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालेच पाहिजे.
समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर, पीएचडी ( इंजिनीअर, वकील, डॉक्टर, एमबीए वगैरे) पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे, रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी म्हणून 30 जानेवारीपासून संदीप पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सर्व समाजाने शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.