तृषाची 110 धावांची नाबाद खेळी; स्कॉटलंडला नमवत उपांत्य फेरीत धडक
। क्वालालंपूर । वृत्तसंस्था ।
मलेशीयामध्ये 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक सुरू असून भारतीय मुलींनी स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय संघाने तृषा गोंगाडीच्या शतकाच्या जोरावर 208 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर आयुषी शुक्ला, वैष्णवी शर्मा यांनी अचूक मारा करून स्कॉटलंडच्या संपूर्ण संघाला 58 धावांत तंबूत पाठवले. आणि भारतीय मुलींनी 150 धावांनी हा सामना आपल्या खिशात टाकला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या जी कमालिनी आणि तृषा गोंगाडी यांनी 13.3 षटकांत 147 धावांची सलामी दिली. कमालिनी 42 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 51 धावांवर बाद झाली. मात्र, तृषा मैदानावर उभी राहिली आणि तिने 59 चेंडूंत 13 चौकार व 4 षटकारांसह 110 धावांची नाबाद खेळी केली. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावत तिने इतिहास रचला आहे. गोंगाडी त्रिशाही ही 19 वर्षाखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. याआधी एकाही फलंदाजाला 100 धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. दरम्यान, तिला सानिका चाळकेने नाबाद 29 धावांची साथ दिली. स्कॉटलंडच्या मॉली पारर्कने 3 षटकांत 46 धावा दिल्या. गॅब्रिएला फॉनटेलानेही 4 षटकांत 42 धावा दिल्या. या संघाकडून मैसे मासेइराने 4 षटकांत 25 धावा देत 1 बळी घेत चांगली गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात स्कॉटलंडला पिपा केली व इमा वॉलशिंघम यांनी चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु, दोघीही वैयक्तिक 12 धावांवर माघारी परतल्या. आयुषी व वैष्णवी यांनी या दोघींना बाद केले. पिपा स्प्रोल 11 धावांवर वैष्णवीला बळी देऊन माघारी परतल्यानंतर स्कॉटलंडच्या अन्य फलंदाजांनी रांग लावली. आयुषीने 3 षटकांत 8 धावा देत 4 बळी घेतले. तर वैष्णवीने 2 षटकांत 5 धावा देत 3 बळी घेतले. तसेच, शतक झळकावणार्या तृषा गोंगाडीने 2 षटकांत 6 धावा देताना 3 बळी घेतले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ 58 धावांत तंबूत परतला आणि भारताने 150 धावांनी सामना जिंकला. भारताच्या पोरींनी सलग पाचव्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
स्वप्नपूर्तीसाठी वडिलांनी विकली जमीन
गोंगाडी तृषा हिला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले आणि मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंब भद्राचलम येथून सिकंदराबाद येथे शिफ्ट झाले. त्यासाठी वडिलांनी त्यांची जिम अर्ध्या किमतीत विकली आणि चार एकर जमिनही विकली.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
110* (59) गोंगाडी त्रिशा विरुद्ध स्कॉटलंड, 2025
93 (56) ग्रेस स्क्रिव्हेन्स विरुद्ध आयर्लंड, 2023
92* (57) श्वेता सेहरावत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023