भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

| पॅरिस | वृत्तसंस्था |

भारत-ग्रेट ब्रिटन यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. 43 मिनिटं 10 खेळाडूंसह खेळूनही भारतीय संघाने कडवी टक्कर दिली आणि 1-1 अशा बरोबरीमुळे मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. ग्रेट ब्रिटनच्या आक्रमणासमोर पी आर श्रीजेश भारतासाठी ढाल बनून उभा राहिला. भारताने हा सामना शूट आऊटमध्ये जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात केली होती. भारताचा गोलकीपर  श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्याने आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये 4  गोलं केल्याने ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या पात्रता फेरीमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या पात्रता फेरीनंतर भारताचा अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे तो बाहेर गेला यानंतर भारताचा कॅप्टन  हरमनप्रीत सिंग याने एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन याने गोल केल्याने 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही.  भारताच्या बचाव फळीने  दमदार कामगिरी करत ब्रिटनला पुन्हा एकही गोल करु दिला नाही. पुढच्या दोन्ही पात्रता फेरीमध्ये भारताच्या बचाव फळीने आणि गोल कीपर श्रीजेशने बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथे भारताने 4-2 असे ग्रेट ब्रिटनला पराभूत केले.  ब्रिटनकडून पहिला गोल जेम्स एल्बेरी याने केला. यानंतर कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने गोल करताना ग्रेट ब्रिटनच्या गोल कीपरला चकवा दिला आणि भारताकडून पहिला गोल केला. यानंतर ब्रिटनने एक गोल केला. भारताकडून सुरजीतने आणखी एक गोल केला. इंग्लंडचे यापुढचे दोन गोल करण्याचे प्रयत्न भारताचा गोल कीपर पीआर  श्रीजेशने हाणून पाडला. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताकडून तिसरा गोल ललितने केला. भारताकडून चौथा गोल राजकुमार पाल याने केला. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

पी.आर. श्रीजेशचा  दमदार बचाव
भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश त्याच्या करिअरमधील शेवटचे ऑलिम्पिक खेळत आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आक्रमक खेळी केली होती. या आक्रमक खेळीला रोखण्याचे काम श्रीजेश आणि बचाव फळीच्या खेळाडूंनी केले. पीआर श्रीजेशच्या बचावामुळं ब्रिटनला गोल करता आले नाहीत. परिणामी मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये  गेली. तिथे भारतासाठी दोन गोल श्रीजेशने रोखले. 

Exit mobile version