39 खेळांसाठी 655 खेळाडूंची निवड
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची अद्ययावत यादी जाहीर करण्यात आली. आता भारतीय खेळाडू 39 खेळांमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. 22 जादा खेळाडूंची निवड करण्यात आली असून, 25 पर्यायी खेळाडूंनाही निवडण्यात आले आहे.
चीनमधील हांगझाऊ येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी 655 खेळाडूंचा चमू भारतासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. तसेच 260 प्रशिक्षक व सहाय्यक अधिकारी दिमतीला असणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून काही खेळांमध्ये नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला. नेमबाजी या खेळामध्ये मनीषा कीर, प्रीती राजक, अंगद वीर सिंग बाजवा यांची, तर थलेटिक्स यामध्ये अमलान बोर्गोहेन, प्रीती, प्राची या खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
जू जितसू या खेळामध्ये अन्वेषा देब, निकिता चौधरी, उमा महेश्वर, कमल सिंग, तरुण यादव यांना संधी देण्यात आली आहे. क्वेटिक्स या खेळात जान्हवी चौधरी हिची, तर वुशू खेळामध्ये सूरज यादव याची निवड झाली. मयांक चाफेकर याची मॉर्डर्न पेंटॅथलॉन या खेळासाठी निवड झाली.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंच्या भत्त्यात बदल केलेला नाही. प्रत्येकाला दिवसाला 50 अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून ते संपल्यानंतरच्या एका दिवसाचा कालावधी यामध्ये असणार आहे. या दरम्यान खेळाडूंना भत्ता दिला जाणार आहे. इंडोनेशियामध्ये 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्येही खेळाडूंना 50 अमेरिकन डॉलर्स भत्त्याच्या रूपात दिले गेले.