यशस्वी जैस्वाल शतकाच्या उंबरठ्यावर
। पर्थ । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील पर्थ येथील कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 17 बळी गेले होते. परंतु, दुसर्या दिवशी मात्र अवघे 3 बळी गेले. दुसर्या दिवस अखेर भारतीय संघाने दुसर्या डावात 57 षटकांत बिनबाद 172 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ दिवस अखेर 218 धावांनी आघाडीवर आहे.
भारताकडून पहिल्या डावात शुन्यावर परतलेल्या यशस्वी जैस्वालने दुसर्या डावात केएल राहुलसोबत दमदार फलंदाजी केली. या दोघांनी दुसर्या दिवसाचे दोन सत्र खेळून काढताना जवळपास पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. दिवस संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल 193 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 90 धावांवर नाबाद होता. तसेच, केएल राहुल 153 चेंडूत 62 धावांवर नाबाद राहिला होता.
दरम्यान, या सामन्यात दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 28 षटकांपासून 7 बाद 67 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. परंतु, दिवसाच्या दुसर्याच षटकात म्हणजे 29 व्या षटकात ऍलेक्स कॅरे याला जसप्रीत बुमराहने बाद करत त्याचे 5 बळी पूर्ण केले. त्यानंतर हर्षित राणाने नॅथन लायनला 5 धावांवर बाद केले.परंतु, शेवटच्या बळीसाठी जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी भारतीय गोलंदाजांना झुंजावले. त्यांनी 110 चेंडू खेळून काढताना 25 धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 100 धावांचा टप्पा पार केला. स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. शेवटी स्टार्कला हर्षित राणाने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांवर संपवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 46 धावांनी पिछाडीवर पडले. या डावात भारताकडून सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराहने घेतल्या, तसेच पदार्पणवीर हर्षित राणाने 3 बळी आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव 150 धावांवर संपला होता. भारताकडून नितीश रेड्डीने 41 धावा आणि ऋषभ पंतने 37 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने 4 बळी घेतले होते.