मार्च ते मे दरम्यान खेळवणार सामने
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एकिकडे बॉर्डर-गावसकर चषक सुरू असतानाच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025 हंगामाचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. अशात या लिलावाच्या दोन दिवसआधीच पुढील तीन हंगामाच्या तारखा समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शुक्रवारी (दि.22) सकाळी फ्रँचायझींशी संपर्क साधला आहे. बीसीसीआयने कळवलेल्या तारखांनुसार आयपीएल 2025 स्पर्धा 14 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच, आयपीएल 2026 स्पर्धा 15 मार्च ते 31 मे दरम्यान खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर आयपीएल 2027 स्पर्धा 14 मार्च ते 30 मे दरम्यान खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या तारखा आधीच घोषित केल्या असल्याने बीसीसीआय आणि आयपीएल अधिकार्यांसह इतर क्रिकेट बोर्डांसाठीही सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल यांच्यात समन्वय राखण्यास मदत होईल. आयपीएल 2025 मध्ये 74 सामने आणि 2026 व 2027 मध्ये 84 सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, असेही समजत आहे की बहुतेक सर्व क्रिकेट बोर्डांनी आयपीएलच्या पुढील तीन हंगामांसाठी खेळणारे खेळाडू संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील असे स्पष्ट केले आहे.
204 खेळाडूंवर बोली
आयपीएल 2025 लिलावाआधी 10 संघांनी मिळून 46 खेळाडूंना रिटेन केल्याने आता लिलावात जास्तीत जास्त 204 खेळाडूंवर बोली लागू शकते. बीसीसीआयने लिलावासीठी 574 खेळाडूंची अंतिम निवड केली होती. यात सौरभ नेत्रावळकर आणि हार्दिक तामोरे यांचाही आता समावेश करण्यात आला आहे. आता एकूण 577 खेळाडू लिलावात असतील, ज्यातील 204 खेळाडूंवर बोली लागू शकते.