मेघालयाविरूद्ध द्विशतकी खेळी
। शिलाँग । वृत्तसंस्था ।
माजी भारतीय धडाकेबाज सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागच्या लेकाने कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेमध्ये द्विशतक ठोकले आहे. शिलाँगमधील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या मेघालाविरूद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना आर्यवीर सेहवागने 200 धावांची नाबाद खेळी केली आहे. आर्यवीरच्या द्विशतकी खेळीच्या जोडीने दिल्लीने सामन्यात दुसर्या दिवसाअंती 208 धावांची आघाडी घेतली आहे.
दरम्यान, मेघालयाचे 5 आगामी फलंदाज अवघ्या 75 धावांवर बाद झाले. पण, चौथ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेल्या गौरव नार्लेंगने सावध खेळी केली. त्याने 7 क्रमांकाचा फलंदाज क्षितीजला साथीला घेत 61 धावांची भागिदारी केली. 60 व्या षटकात नार्लेंग 19 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर क्षितीजने अंगकीतसोबत पुन्हा 65 धावांची भागीदारी उभारली. पण 218 चेंडूत 62 धावांवर क्षितीज बाद झाला आणि मेघालयाचा पहिला डाव 260 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात दिल्लीच्या सलामीवीरांनी मोठी खेळी केली. अर्नव बग्गा व आर्यवीर सेहवागच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 180 धांवांची मोठी भागीदारी केली.
180 धावांवर दिल्लीने आपला पहिला गडी गमावला. अर्नव बग्गा 108 चेंडूत 19 चौकार व 3 षटकारांसह 114 धावांची शतकी खेळी करून बाद झाला. त्यानंतर 3 क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या वंश जेटलीने 43 धावांची खेळी केली. आर्यवीर व वंशने 100 धावांची भागीदारी केली. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज धन्य नाक्राने आक्रमक खेळी करत दिवअंती पर्यंत 91 चेंडूत 98 धावांची खेळी केली. तर, आर्यवीर सेहवागने द्विशतकी खेळी केली, ज्यामध्ये त्याने 34 चौकार व 2 षटकार ठोकले. त्याच्या देशांतर्गत क्रिकेटच्या कारकिर्दितील हे पहिलंच द्विशतक आहे. दिल्लीने पहिल्या डावात 2 बाद 468 धावा करत सामन्यात 208 धावांची आघाडी घेतली आहे.