। मेलर्बन । वृत्तसंस्था ।
भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचला असून, सर्वाधिक गुण घेत भारताने सेमीफायनल गाठली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकांच्या जोरावर 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. झिम्बाव्बेचा संघ अवघ्या 115 धावांत गारद झाला. या विजयानंतर सर्वाधिक आठ गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल असल्याने भारताची सेमीफायनलमध्ये इंग्लंड संघाशी 10 नोव्हेंबरला लढत होणार आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत कमाल कामगिरीमुळे भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, त्यामुळे आजचा सामना औपचारिकता होती. भारताची सुरुवात अडखळ झाली. सलामीवीर रोहितला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. तो 15 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. परंतु, एका बाजूने सलामीवीर राहुलने संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सूर्यकुमारच्या तडाखेबाज खेळीमुळे भारताला झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर उभा करता आला. सूर्यकुमारने 25 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा चोपून काढल्या.
187 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर त्यांचा सलामीवीर वेस्ले भुवीच्या बॉलिंगवर कोहलीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे विकेट्स पडणं कायम होतं. भारताच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा कोणताच फलंदाज टिकू शकत नव्हता. पण त्यांचा स्टार फलंदाज सिकंदर रझा (34) याने मात्र एकहाती झुंज दिली. त्याला आर. बर्ल (35) यानेही चांगली साथ दिली. पण अखेर दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि भारतानं 71 धावांनी विजय मिळवला. आता भारताची सेमीफायनलमध्ये झुंज इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबर रोजी असणार आहे.