दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

महिला बचत गटांची लगबग सुरू; नोकरी करणाऱ्या महिलांचा तयार फराळाकडे कल

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

दिवाळीचा सण जवळ येऊ लागल्याने घराघरांत फराळाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या फराळातील चकलीचा कुरकुरीतपणा, लाडवांचा गोडवा, चिवड्याचा खमंगपणा आणि करंजीची चव यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो. मात्र, नोकरी, घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना महिलांना पारंपरिक फराळ बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने तयार फराळ खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे.

पनवेल परिसरात दिवाळीच्या फराळासाठी महिला बचत गटांनी तयारी सुरू केली आहे. त्यात पनवेल येथील तारा बचत गट सध्या फराळाचे विविध पदार्थ बनवण्यात व्यस्त आहे. दिवाळीच्या काळात घरगुती चवीचा, ताज्या फराळाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ ऑर्डर देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

दिवाळीचा फराळ बनवणे हे एकट्या व्यक्तीचे काम नाही. भाजणी तयार करणे, पीठ मळणे, चकल्या पाडणे, तळणे, लाडू वळणे, करंज्या भरणे आणि पदार्थ व्यवस्थित पॅक करणे, अशी अनेक कामे एकाच वेळी करावी लागतात. त्यामुळे महिला एकत्र येऊन फराळ तयार करताना कामाची विभागणी करतात. यातून पदार्थांची गुणवत्ता राखण्यासोबतच वेळेचे नियोजनही करता येते. तारा बचत गटाकडून विशेषतः भाजणीच्या चकलीला महत्त्व दिले जाते. योग्य प्रमाणात भाजलेली डाळी-कडधान्ये, मसाल्यांचा वापर आणि चकलीला मिळणारा कुरकुरीतपणा यामुळे भाजणीच्या चकलीला फराळात विशेष स्थान आहे. चकलीसोबतच लाडू, शंकरपाळी, चिवडा आणि करंज्या यांसारखे पारंपरिक पदार्थ बनवण्याची तयारीही सुरू आहे.

कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम
यंदा फराळ बनवण्यासाठी लागणारे खाद्यतेल, डाळी, साखर, रवा, बेसन, सुकामेवा आणि इतर साहित्य यांच्या किमती वाढल्याने फराळाच्या खर्चातही वाढ होत आहे. परिणामी तयार फराळाच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना चव, गुणवत्ता आणि बजेट यांचा मेळ साधावा लागत आहे.
फराळाचे अंदाजे दर (प्रतिकिलो)
भाजणीची चकली : 650 ते 700
चिवडा : 550 ते 600
शंकरपाळी : 500 ते 550
बेसनाचे लाडू : 650 ते 750
रव्याचे लाडू : 600 ते 700
करंज्या : 650 ते 750
बचत गटांना रोजगाराची संधी
तयार फराळाच्या वाढत्या मागणीमुळे महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. घरगुती चवीचे पदार्थ तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच महिलांना एकत्रितपणे काम करण्याची संधीही मिळते. दिवाळीच्या काळात मिळणाऱ्या ऑर्डरमुळे बचत गटांच्या कामाला गती येते.
Exit mobile version