प्रकल्प सुरु करा, अन्यथा जमिनी परत करा; प्रकल्पग्रस्तांची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काळवड खाडीत प्रकल्प उभारण्याचे आमिष दाखवून या परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र आजतागायत पटण एनर्जीसह अन्य दहा कंपन्यांनी कोणताही प्रकल्प उभारलेला नाही. ही प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक असून, संबंधित कंपन्यांनी हे प्रकल्प उभारुन स्थानिकांना रोजगार द्यावा, अन्यथा संपादित केलेल्या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी समाज क्रांती संघटना संचलित मौजे मेढेखार, काळवडखाडी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पटनी एनर्जीसह गायत्री लॅन्ड रियालिटी, गणेश लॅन्ड इन्फ्रान्स्ट्रक्चर, गिरीराज लॅन्ड रियालिटी, हिंग्लज लॅन्ड इन्फ्रान्स्ट्रक्चर, गोकूळ लॅन्ड इन्फ्रान्स्ट्रक्चर, गजेंद्र लॅन्ड रियालिटी आदी कंपन्यांनी संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनी प्रकल्प उभारण्यासाठी संपादित केल्या होत्या. समाज क्रांती संघटनेचे अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, प्रकाश म्हात्रे, मोहन पाटील, प्रेरणा खरसंबळे, विश्‍वनाथ पाटील, प्रभाकर कोठेकर आदींनी हे निवेदन तहसिलदार अलिबाग  यांना सादर केले आहे. या निवेदनात ते म्हणतात की, सदर सर्व शेतकरी मेढेखार-काळवडखाडी विभागातील आहेत. एकूण 376 शेतकरी प्रकल्पग्रस्त-अन्यायग्रस्त आहेत. पटनी एनर्जी व इतर नऊ कंपन्यांनी अत्यंत कमी दरात जमिनी खरेदी केल्या आहेत. सदर सर्व व्यवहार साधारणपणे 2006, 2007, 2008 व 2009 मध्ये झालेली आहेत.

सदर सर्व कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनींच्या ठिकाणी शेती उद्योगाशी संमधीत व इतर व्यवसाईक प्रकल्प उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्येक प्रकल्पात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबातील बेरोजगार तरुण व तरुणींना नोकरी देण्याचे वचन दिलेले होते. परंतु आजपर्यंत सदरील सर्व जमिनी ओसाड असून तेथे कांदळवन वाढलेले आहे, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या जमिनींचे फार मोठे नुकसान झालेले आहे. आम्ही सर्व शेतकरी सद्या वृद्ध व आजारी अवस्थेत आहेत. आमची फार मोठी फसवणूक झालेली आहे. आमची मुले बेरोजगार असून आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. असा आरोपही करण्यात आला आहे. 

म्हणून आमची अशी मागणी आहे की सदर जमिनी सदर दहा (10) कंपन्यांनी त्यांना प्रकल्प उभारायचे असतील तर आजच्या बाजारभावाने खरेदी कराव्यात व आम्हाला दिलेली रक्कम वजा करुन बाकीची रक्कम बाजारभावाप्रमाणे अदा करावी. तसेच आमच्या कुटूंबातील बेरोजगार मुलांना नोकर्‍या मिळवून द्याव्यात. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर हे शक्य होत नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला विनामुल्य परत कराव्यात व इतक्या वर्षात शेती न पिकवल्यामुळे आमचे जे आर्थिक व इतर नुकसान झालेले आहे ते भरुन द्यावे व आमच्या जमिन पुर्ववत करुन द्याव्यात असे सुचित करण्यात आले आहे.

मे पटनी एनर्जी व इतर कंपन्यांनी पूर्ण फसवणूक केलेली आहे. 1)जमिनीचा एकरी भाव कमी दिलेला आहे. 2) ठरल्याप्रमाणे पुर्ण किंमत सुद्धा बर्‍याच शेतकर्‍यांना दिलेली नाही काही शेतकर्‍यांना अर्धी रक्कम (50%) देऊन कंपनीने जमिनी नावावर केलेल्या आहेत. असेही निदर्शनास आणण्यात आले आहे.

Exit mobile version