वाहतूक कोंडीमुक्त शहरासाठी पुढाकार

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, धाटाव औद्योगिक वसाहतीमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात लोकसंख्येत आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रोहा-अष्टमी नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजय एडके, उपनगराध्यक्ष, नगसेवक, रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय शेलार, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार, वाहतूक नियंत्रण पोलीस, रिक्षा व टेम्पो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत रोहा शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यामध्ये रिक्षा आणि टेम्पोसाठी विशिष्ट जागा निश्चित करून त्यांना नियमावली लागू करणे, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत प्रवेशबंदी करणे, एमआयडीसीच्या बसेससाठी ठराविक थांबे निश्चित करणे, तसेच सागर डेअरी आणि येवले चहा परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे. यासोबतच शहरातील पार्किंग व्यवस्थाही अधिक शिस्तबद्ध करण्यावर भर देण्यात आला. या सर्व उपाययोजनांबाबत लवकरच अधिकृत पत्रक काढून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी शिस्तबद्ध आणि वाहतूक कोंडीमुक्त रोहा घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडून नियम तयार केले जातील; मात्र, त्यांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यामुळे प्रत्येक रोहेकराने वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version