तालुक्यातील 272 शाळांमध्ये चला झाडे लावू या अभियान
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वसुंधरा बचाव आणि पर्यावरण संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या मध्यातून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 272 शाळांमध्ये चला झाडे लावू या हे अभियान राबविण्यात सुरुवात झाली आहे.कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात सुरुवात झाली आहे.
तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या 272 शाळा असून या सर्व शाळांच्या आवारात पिंपळ आणि वड ही मोठ्या प्रमाणात वाढणारी वृक्ष लावून त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि आपली वसुंधरा बचाव ही दोन्ही उद्दिष्टे यशस्वी होणार आहेत. हे लक्षात घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये चला झाडे लावू या हे अभियान सुरू झाले.तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या संकल्पनेतून चला झाडे लावूया ऑक्सिजन वाढवूया या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अभियानासाठी नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेने सर्व झाडे उपलब्ध करून दिली आहेत.
या उपक्रमाची सुरुवात आज सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद शाळा सुगवे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या हस्ते वड आणि पिंपळ या पवित्र वृक्षांची लागवड करून झाली. त्यावेळी जिल्हा उपशिक्षणाधिकारी भोपळे, कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण आधिकारी संतोष दौंड, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.