। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड आगारामध्ये असणारी अस्वछता दूर व्हावी व प्रवासी वर्गाला चांगली सुविधा मिळावी त्याच प्रमाणे पिण्याचे पाणी व प्रवासी शेड मधील पंख्याची गैरसोय, आगरात वाढलेली झाडे झुडपे अशा विविध सेवा आगारातून प्रवासी वर्गाला मिळण्यासाठी समाजसेवक व पद्मदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी जन आंदोलनाचा इशारा दिला होता.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी रायगड रामवाडी पेण येथील विभाग नियंत्रक अनघा बारटक्के याना सुद्धा दिले होते.
याबाबतची सत्य परस्थिती पहाण्यासाठी रायगड जिल्हा विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी स्वतः मुरुड आगाराला भेट दिली.यावेळी त्यांनी संपूर्ण आगाराची पहाणी करून त्यांनी समाजसेवक अरविंद गायकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी गायकर यांनी मुरुड आगारातील परस्थिती लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी जनांदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुरुड आगारातील सर्व सुधारणा तातडीने करण्याची मागणी केली. आगारातील काँक्रिटीकरण जलद गतीने करणे आवश्यक आहे. यासाठी विभाग नियंत्रक यांनी वेळीच लक्ष देणे खूप आवश्यक असल्याचे मत सुद्धा गायकर यांनी व्यक्त केले.
यावर विभाग नियंत्रक बारटक्के यांनी काँक्रिटचे काम रखडले आहे हे सत्य आहे.लवकरात लवकर सुद्धा करण्यात येईल. त्याच बरोबर स्वच्छता व सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी अग्रक्रमाने लक्ष देणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश सुद्धा आगार व्यवस्थपकाला यावेळी त्यांनी दिले आहेत.