विकासकामांसाठी एनओसी मागणार्‍या महिला सदस्येला शिवीगाळ

चिंचोटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील प्रकार
प्रकाश घरत विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळवून प्रशासकीय मान्यता मिळवून देखील त्यासाठी नाहरकत दाखल्याची मागणी ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत करणार्‍या शेकापच्या महिला सदस्या देवयानी पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन अपमानीत करणार्‍या ग्रामपंचयात सदस्य प्रकाश घरत याच्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विकासकामे करु पाहणार्‍या राजकीय विरोध करणार्‍यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
विकासकामांची बोंब असल्याने शेकापक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्या देवयानी पाटील यांनी चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीतील चार गावांच्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेत परिश्रमपुर्वक प्रयत्न करुन विकासकामांना मंजुरी मिळवली. तसेच या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त करुन घेतली. मात्र या कामांचा आरंभ करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखले व देखभाल दुरुस्तीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सदर दाखले सरपंच बिंदीता पाटील व उपसरपंच यांनी टाळाटाळ केली. त्याबाबत ग्राम पंचायतीच्या मासीक सभेत विचारणा केली असता आम्हाला वरिष्ठांना विचारावे लागेल असे उत्तर दिल्याने सर्व सदस्य आवाक् झाले. याबाबतचा जाब देवयानी पाटील तसेच शेकापक्षाच्या सहा सदस्यांनी विचारला असता सदस्य प्रकाश घरत यांनी अर्वाच्य भाषेत देवयानी पाटील यांना शिवीगाळ करीत तुमचे सदस्य झोपा काढायला येतात की वडापाव खायला येता असे बोलून अपमान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकापक्षाच्या सदस्यांनी प्रकाश घरत याच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार प्रकाश घरत याला दंडधिकार्‍यांच्या मार्फत समज देण्यात आली आहे.
दरम्यान, गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार्‍या शेकापक्षाच्या महिला सदस्यांना शिवीगाळ करणार्‍या मस्तवाला सदस्याविरोधात संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विकासाला आडकाठी करणार्‍या अशा झारीतल्या शुक्राचार्यांना जनताच धडा शिकवेल अशी अपेक्षा देवयानी पाटील यांनी व्यक्त केली.

Exit mobile version