आमदार दळवींना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महायुतीचे उमेदवार म्हणून आ. महेंद्र दळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु, त्यांच्या मनमानी कारभारामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असल्याची चर्चा सुरु आहे. दळवींवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा फटका या निवडणुकीत दळवींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार करण्यात आला. आरोप-प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले. दरम्यान, महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांची लढत महाविकास आघाडी पुरस्कृत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्यासोबत आहे. प्रचारात चिऊताई यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे महेंद्र दळवी यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील खासदार सुनील तटकरे यांचे चौलमधील समर्थक व काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे काम करणार्या खानावमधील बड्या नेत्यांवर दळवींनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर काम करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मार्गाने तंबी देण्यात आल्याची चर्चा असून, ती जगजाहीर होऊ लागली आहे. दळवींच्या या मनमानी कारभारामुळे महायुतीमधील काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दळवींच्या या भूमिकेबाबत अनेकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. तसेच अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांनीदेखील दळवींवर विश्वास नसल्याचे अनेकवेळा त्यांच्या भाषणातून उदाहरणासहित व्यक्त केले आहे. त्यामुळे दळवींवर या सर्वांच्या रोषाला बळी पडावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दळवी विश्वासातील व्यक्ती नसल्याचेही अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दळवींना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.