संविधान बदलून हिंदूराष्ट्र आणण्याचा डाव


शेकाप ऑनलाईन व्याख्यानमालेत
सुरेश सावंत यांचा आरोप

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
भारताच्या संविधानाचा पाया उखडून काढायला सुरुवात केली आहे. सार्वभौमत्व,लोकशाही आणि संविधानिक नैतिकता सरकारने गुंडाळुन ठेवली आहेत. देशाची वाटचाल ही लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरु झाली आहे, असे मत संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश सावंत यांनी  व्यक्त केले.

शेकाप युवा कार्यकर्ता व अभ्यास शिबिरांंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे सहावे व्याख्यान आयोजन रविवारी 13 जून करण्यात आले  होतेे.  या व्याख्यानमालेचा विषय होता भारतीय संविधानाची मूल्ये आणि आजची आव्हाने. संविधान संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश सावंत सत्राचे प्रमुख वक्ते होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेकाप विधी आघाडी समन्वयक अ‍ॅड. देवेंद्र आव्हाड होते. या ऑनलाईन व्याख्यानमालेत साम्या कोरडे, बाबासाहेब देशमखु, राजेंद्र कोरडे, रामदास जराते, संपतराव पवार, आदी सहभागी झालेले होते.

सुरेश सावंत म्हणाले की, भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती संविधानाने जपली आहेत. संविधानाची उद्देशिकामध्ये संविधानाचे सर्वमुल्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहेत.त्यामध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक, सार्वभौम, समाजवादी,स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, न्याय इ.ही राज्यघटनेची मूल्ये आहेत. परंतु केंद्र सरकार घटनेचे अनुसरण करीत नाही, ते त्यांच्या फायद्यासाठी ते बदलत आहेत आणि त्यांची विचारसरणी पसरवित आहेत. सीबीआय प्रमुखांची निवड, सीएए कायदा, नोटाबंदी, एक देश एक निवडणूक धोरण, कलम 370 रद्द करणे ही केंद्र सरकार घटनाबाह्य आणि घटनात्मक मूल्यांचा भंग कसे केले याचेे उदाहरण आहे असे ते म्हणाले.

तसेच, समाजवादाची ऐशीतैशी सरकारने केली आहे.केंद्र सरकारने चालवलेले खासगीकरण धोरण भांडवलशाहीकडे नेईल आणि यामुळे समाजात भविष्यकाळात विषमता निर्माण होईल. कारण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षणाची हमी असणार नाही,अशी टीकाही सावंत यांनी केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ, राष्ट्रवाद आणि देशविरोधी याचा अर्थ बदलला आहे. आज अशी विचारसरणी आहे की, तुम्ही जर सरकार विरुद्ध बोललात तर तुम्ही राष्ट्राविरूद्ध बोललात जे खूप चुकीचे आहे.राज्यघटनेत धर्म आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे, हे धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन आहे जे लोकशाहीला अत्यंत घातक आहे.
सुरेश सावंत

Exit mobile version