मुरुड समुद्रात परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी

स्थानिकांच्या तोंडचा घास पळविला
| मुरूड | वार्ताहर |
मुरुडच्या समुद्रात परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी सुरु असून,हे मोठे ट्रॉलर्सवाले स्थानिक मच्छिमारांचा तोंडचा घास पळवून नेत असल्याचे उघड होऊ लागले आहे. वादळी पावसामुळे मुरूड च्या समुद्रात ऐन सीझनमध्ये मासेमारी बंद असल्याने स्थानिक मच्छिमार हवालदिल झाले होते.वादळ शमले असून कोळंबीची मासेमारी तीन दिवसांपासून सुरू झाली होती.

मात्र अचानक मुरूड पदमदुर्ग किल्याच्या परिसरातील समुद्राच्या 12 वावच्या परिसरात परगावच्या मोठया नौकांनी नियमबाह्य पद्धतीने कोळंंबीची बेसुमार मासेमारी केल्याने स्थानिक मच्छिमाराना कोळंंबी मिळण्याचे प्रमाण खूप घटले आहे. कोलंबी मासेमारीस गेल्यास होडीच्या एक फेरीचे डीझेल चे पैसे देखील मिळत नाहीत अशी माहिती शुक्रवारी एकदरा येथील तांडेल महादु वेटकोळी, यांनी दिली. या नियमबाह्य मासेमारीमुळे आमच्या स्थानिक मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून आम्ही हवालदिल झाल्याचे एकदरा, मुरूड येथील व्यावसायिकांनी सांगितले.

परप्रांतीय मोठया नौकांना समुद्रात 12 वाव पुढील समुद्रात मासेमारी करण्याची शासनाची परवानगी आहे. हा नियम धुडकावून लावून परगावच्या मोठ्या नौका स्थानिक मच्छिमारां साठी असणार्‍या समुद्र क्षेत्रात येऊन सर्व प्रकारची मासळी मारून वेगाने निघून जातात. यामुळे स्थानिक आणि छोटे मच्छिमार उघड्यावर पडतात. फिशरीज खात्याने याकडे लक्ष घालून मोठया नौकांच्या या नियमबाह्य प्रकाराबाबत पायबंद घालायला हवा; फिशरीज कडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने असा प्रकार वाढीस लागला आहे. यामध्ये राजपुरी,एकदरा,मुरूडमधील नौकां मालकांचे खूप नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोळंबीचा मोठा सीझन आहे.परंतु बाहेरच्या मोठया मासेमारी नौका समुद्रात 12 वावच्या आता बिनदिक्कत मासेमारीस येत असल्याने स्थानिक मच्छिमारांच्या तोंडचा घास यांनी पळविला आहे.स्थानिक सध्या खूप आर्थिक अडचणीत सापडले आहेत.काहीं नौकांच्या डिझेलचा खर्च सुटत नसल्याने मासेमारीस जात नाहीत.

– पांडुरंग आगरकर,कोळी समाज अध्यक्ष


Exit mobile version