60 नौकांची मासेमारी ठप्प
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुडच्या मच्छिमारांवर पुन्हा जेलीफिशचे अरिष्ट आले असून, मुरूड आणि एकदरा येथील मासेमारी पुन्हा ठप्प झाल्याची माहिती मुरूड कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. याप्रसंगी ज्येष्ठ मच्छिमार मनोहर मकू आणि मच्छिमार बांधव उपस्थित होते.
मुरूड आणि एकदरा येथील सुमारे 60 नौका दररोज डिझेल खर्चून मासेमारीस जातात; परंतु रिकाम्या हाताने परत येत आहेत. गेल्या महिन्यापासून 50 टक्के नौका समुद्र किनार्यावर नांगर टाकून उभ्या आहेत. प्रत्यक्षात मासळीची फार भीषण स्थिती आहे. एप्रिल, मे महिन्यापर्यंत अशा परिस्थितीत मासेमारी सुरू राहणार असून, 1 जूनपासून पावसाळी मासेमारी पुढील दोन महिने बंद राहणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारी ठप्प होती. या वर्षात जेलिफिशचे संकट दोन वेळा आले आहे. सध्या कोलंबीचा सिझन असल्याने मुरूड, एकदरा येथील छोट्या यांत्रिक नौका दहा वावपर्यंत कासा किल्ला परिसरात मासेमारीस जात असतात. आता याचा भागात जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्याने कोलंबीऐवजी जेलिफिश प्रचंड प्रमाणात सापडत असून, यांच्या स्पर्शाने अंगाची लाहीलाही होत असल्याची माहिती अनेक मच्छिमारांनी दिली. सरकारकडून आम्हाला मदतीचे कोणतेही पॅकेज नाही. मोठ्या उद्योगपतींची बँकेतील कर्जे राईट ऑफ होतात. परंतु, आमच्यासारख्या सामान्य मच्छिमारांची कोणतीही दखल सरकार घेत नसल्याने मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
मच्छिमारी व्यवसायातून हजारो कोटींची उलाढाल आणि परकीय चलन देशाला मिळत असते. त्याच उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने पारंपरिक मच्छिमार संतापला आहे. मुरूड व एकदरा येथील मच्छिमार रात्री 11 वाजता 10 ते 15 वाव समुद्रात मासेमारीस जाऊन दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता मुरूड किनार्यावर परत येतात. जी मासळी मिळते, त्यातून डिझेलचा खर्चदेखील सुटत नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. घरचा प्रपंच किंवा उदरनिर्वाह कसा करायचा, हे मोठे संकट मच्छिमारांवर आहे.