अतिवृष्टीचे पंचनामे करताना यंत्रणेची दमछाक

शेतामध्ये पाणी साचल्याने सर्वेक्षण करणे कठीण
अहवालात आतापर्यंत 11 हजार शेतकरी बाधित
4246 .31 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे झाले नुकसान
सुमारे 3967 हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले पूर्ण

| रायगड | प्रतिनिधी |
जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यात पावसाच्या रेड आणि ऑरेंज अलर्टने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आणि आता शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करताना यंत्रणेची दमछाक झाली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 246.31 हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्याखाली गेले. यामुळे जिल्ह्यातील 813 गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. यंत्रणेने भातपीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 640 गावांमधील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत पंचनामे पूर्ण झालेल्या अहवालानुसार 11 हजार शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसल्याचे सामोर आले आहे. अद्यापही 173 गावांमधील शेतीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली आहे.

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला. जिल्ह्यातील शेताचे बांधदेखील पुराच्या पाण्याखाली गेलं. यामुळे नुकतीच पेरणी झालेली भाताची रोपे आणि भातलागवड पाण्याखाली राहिल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये जिल्ह्यात 4 हजार 246.31 हेक्टर क्षेत्रावरील भात लागवडीचे नुकसान झाले आहे. यामध्ये 813 गावांमधील 6 हजार 623 शेतकरी बाधित झाले आहेत, असा अहवाल होता. मात्र, प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार 11 हजार शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 640 गावांमधील 3 हजार 967.54 हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील 813 गावांमधील 6 हजार 623 शेतकरी बाधित झाले असून, 4 हजार 246 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अलिबाग 62 गावांमधील 642 शेतकरी, 261.10 हेक्टर, पेण 103 गावांमधील 825 शेतकरी, 638 हेक्टर क्षेत्र, मुरूड 6 गावे, 464 शेतकरी, 137 हेक्टर क्षेत्र, खालापूर 94 गावे, 583 शेतकरी, 123.89 हेक्टर क्षेत्र, पनवेल 105 गावे, 726 शेतकरी 53.87 हेक्टर क्षेत्र, उरण 35 गावे, 1030 शेतकरी, 455 हेक्टर क्षेत्र, कर्जत 46 गावे, 169 शेतकरी 37.42 हेक्टर क्षेत्र, माणगाव 48 गावे, 744 शेतकरी, 205 हेक्टर क्षेत्र, तळा 4 गावे, 12 शेतकरी, 3 हेक्टर क्षेत्र, रोहा 185 गावे, 3 शेतकरी, 3.50 हेक्टर क्षेत्र, पाली 82 गावे, 163 शेतकरी, 26.65 हेक्टर क्षेत्र, महाड 26 गावे, 172 शेतकरी, 27.66 हेक्टर क्षेत्र, पोलादपूर 16 गावे, 76 शेतकरी, 27.41 हेक्टर क्षेत्र, श्रीवर्धन 1 गाव, 1 शेतकरी आणि 20 गुंठे क्षेत्र पावसाच्या पाण्याने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा होता. प्रत्यक्ष पंचनामे कारण्यास सुरुवात झाली आणि बाधित क्षेत्र आणि शेतकरी यांच्या संख्येत वाढ झाल्याचे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील पंचनामा अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version