रेलिंग तुटल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी
। पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली महामार्गावरील जंगली पीरजवळ रस्त्याच्या एका बाजूच्या लोखंडी संरक्षण रेलिंग तुटले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
पावसाळी पर्यटनासाठी खोपोली वाकण महामार्गावर सध्या रहदारी वाढल्याचे चित्र आहे. या महामार्गावर रात्रंदिवस वाहनाची रहदारी असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा वाकण खोपोली हा रस्ता एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या महामार्गावर रहदारी करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी चालक अतिवेगाने वाहन चालवतात. पाली- वाकण मार्गावरील जंगली पीर येथील लोखंडी रेलिंग तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएसआरडीसीकडे वाकण-पाली- खोपोली महामार्ग हस्तांतरित करण्यात आला असून, वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण संबंधित ठेकेदाराकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसत आहे.
अवजड वाहनांची वर्दळ अधिक
महामार्गावर अनेक औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे असल्यामुळे या मार्गावरून छोट्या वाहनांपासून अवजड वाहनांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यात हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. जंगली पीरजवळ वळण असल्याने वाहन चालकाला तुटलेले रेलिंग लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका आहे.
वाकण-पाली या महामार्गावरील जंगली पीरजवळ रस्त्याच्या एका बाजूच्या लोखंडी संरक्षण रेलिंग तुटले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या रेलिंग लवकरात लवकर बसविण्यात याव्यात. पाऊसाला सुरू झाला आहे. या दरम्यान कोणता अपघात झाल्यास त्याला जबाबदार एमएसआरडीसी असेल.
– हरेश टके, प्रवासी वाहन चालक , नागोठणे