पाली-खोपोली महामार्गावर बेशिस्त पार्किंग

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

पाली-खोपोली महामार्गावरील परळी आणि पेडली परिसरात बेशिस्त पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन्ही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या दुकानांसमोर ट्रक, टेम्पो, रिक्षा तसेच दुचाकींचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, एसटी बस, खासगी प्रवासी वाहने आणि दुचाकींची ये-जा सुरू असते. मात्र, परळी व पेडली येथे रस्त्याच्या कडेला तसेच दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होते. काही वेळा समोरासमोर वाहने आल्यास वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत या समस्येची तीव्रता अधिक जाणवते. रिक्षा, टेम्पो आणि मालवाहू ट्रक कुठेही उभे केले जात असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांनाही मार्ग काढताना कसरत करावी लागते. अशा बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताचा धोका नाकारता येत नाही.

महामार्गावरील या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कायमस्वरूपी किंवा नियमित वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करणे, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे आणि वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महामार्ग वाहतुकीसाठी आहे की वाहनांच्या बेशिस्त पार्किंगसाठी? असा संतप्त सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वाहतूक पोलीस विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन परळी व पेडली येथे वाहतूक पोलीस नियुक्त करावेत आणि बेशिस्त पार्किंगवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version